marathi">

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीझ होणार ‘एबी आणि सीडी’

 

 
 
तुम्ही, आम्ही काय संपूर्ण देशच लॉकडाऊन असल्यामुळे डिजीटल प्लॅटफॉर्म्सवर ज्या वेब सिरीज आणि जे सिनेमे उपलब्ध आहेत ते आपण सर्वजण पाहत आहोत. आणि आता यामध्ये मराठी सिनेसृष्टीने एक पाऊल पुढे टाकल्यामुळे प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे.  
 
‘अमिताभ बच्चन मराठी सिनेमात झळकणार’ पासून “चंदू मी आलोय” हा त्यांचा डायलॉग या दरम्यान त्यांच्या ‘एबी आणि सीडी’ सिनेमाची सर्वत्र प्रचंड चर्चा झाली. बिग बी आणि विक्रम गोखले यांची फार जुनी मैत्री आहे हे कळल्यावर अनेकांची सिनेमाविषयीची उत्सुकता वाढली होती पण कोरोनासारख्या भयाण वास्तव्यामुळे प्रेक्षक आणि सिनेमा यांची गाठभेट झाली नाही. परंतू आता लवकरच त्यांची भेट होणार आहे आणि ते ही आपल्या घरात. 
 
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी मिलिंद लेले दिग्दर्शित आणि हेमंत एदलाबादकर लिखित ‘एबी आणि सीडी’ सिनेमाचा प्रिमिअर अ‍ॅमेझॉन प्राईमवर आयोजित करण्यात आला आहे. कोविड १९च्या वॉरिअर्सला समर्पित करुन हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईम या डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय अशी घोषणा सिनेमाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी केली. 
 
याविषयी आपले मत व्यक्त करताना निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी म्हटले की, “अतिशय दुर्देवी असा हा रोग कोविड १९ भारतात येऊन ठेपला आणि या बाबतीत आपण सर्वजण असहाय्य होतो. जनतेची सुरक्षितता आणि त्यांचे स्वास्थ्य या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जनतेच्या पाठिंब्याशिवाय काहीही शक्य नाही म्हणून आम्ही १४ एप्रिलपर्यंत असलेल्या लॉकडाऊननंतरच सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्याचा विचार केला. पण जसा १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढला तेव्हा सिनेमाचे डिजीटल पार्टनर अ‍ॅमेझॉन प्राईम यांच्यासोबत चर्चा झाल्यावर सिनेमा एका विशिष्ट तारखेला रिलीझ करण्याचे ठरले. १ मे हा कामगार दिन म्हणून ओळखला जातो आणि कामगारांच्या मेहनतीमुळेच आज 
ब-यापैकी कोविड १९ या रोगावर मात करण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत. म्हणून माझी अशी इच्छा होती की, कामगार दिनाच्या शुभ दिनी, आपल्या वॉरियर्संना समर्पित करुन ‘एबी आणि सीडी’ अ‍ॅमेझॉन प्राईमवर वर प्रदर्शित केला जावा.”
 
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य सरकारने चित्रपटगृह ठराविक काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा हा निर्णय घेतला गेला त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजेच १३ मार्चला अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांची प्रमुख भूमिका असलेला ‘एबी आणि सीडी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. गेल्या महिनाभर संपूर्ण महाराष्ट्र आणि आपला भारत देश अगदी हिमतीने आणि धैर्याने कोविड १९शी सामना करतो आहे. या गंभीर परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज असलेले आपले डॉक्टर्स, नर्स, पोलिस, सफाई कामगार आणि सरकारी कर्मचारी यांना ‘एबी आणि सीडी’ टीमच्या वतीने सलाम! 
 
अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांच्या मैत्रीवर आधारित असलेल्या या सिनेमात नीना कुळकर्णी, सुबोध भावे, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, शर्वरी लोहोकरे, सागर तळाशीकर, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश या कलाकारांच्या भूमिका आहेत. अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित ‘एबी आणि सीडी’ हा कौटुंबिक सिनेमा आपल्या कुटुंबासह नक्की पाहा आणि स्वत:ची, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

Leave a comment